जिमला जाणे सुरक्षित आहे का? व्यवसाय आणि सार्वजनिक ठिकाणे हळूहळू सुरू झाली आणि होत आहेतही. या सगळ्यात जिम आणि फिटनेस सेंटरचा नंबर शेवटचा. हे सर्व नक्कीच चांगले आहे, पण त्यात आलेली कोविड संदर्भातली नवी बातमी म्हणजे हा हवेतून पसरतो.
जिम पुन्हा सुरू झाल्यावर ती जागा नक्कीच सर्वात धोकादायक जागा आहे. जिम आणि कोरोना विषाणूसाठी त्यातले धोके याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी ई टीव्ही सुखीभव टीमने प्रदीप मौर्य यांच्याशी बातचीत केली. प्रदीप मौर्य फिटनेस इंडस्ट्रीत गेली दशकभर काम करत आहेत. त्यांनी वेट रूम, कार्डिओ मशीन आणि क्लासेस याबद्दलचे सल्ले दिले. प्रभावी असलेले जिम वाइप, कुठली उपकरणे अयोग्य आहेत, ट्रेडमिल आणि वर्कआऊटच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग कसे पाळायचे आणि वर्कआऊट करताना खांद्यावर अनेक टाॅवेल्स का ठेवायची, याबद्दल त्यांनी सांगितले.
प्रदीप म्हणाले, महत्त्वाची अडचण अशी, की जिम सुरू करताना नक्की काय काळजी घ्यायची याबद्दल तज्ज्ञांनी निश्चित असे काही सांगितले नाही. त्यामुळे आता जिम उघडताना सुरक्षा आणि संसर्ग होऊ नये म्हणून वैयक्तिकरित्या काळजी घ्यावी लागणार आहे. ते पुढे म्हणाले की, कोविड संसर्गाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या नव्या माहितीनुसार तर जिम पुन्हा सुरू करणे हे कठीण होऊन जाते.
जगभरातल्या २३९ शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की कोविडचे छोटे कण लोकांमध्ये संक्रमित होऊ शकतात आणि त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला सुधारित शिफारसी करायला सांगितल्या आहेत.
श्वासोच्छवासातून विषाणूचे थेंब हवेत तरंगू शकतात. तसेच पृष्ठभागावर पडू शकतात आणि मग हा विषाणू आपल्या शरीरात डोळे, नाक किंवा तोंडावाटे जाऊ शकतो.
जोरदार व्यायाम केल्याने आपल्या फुफ्फुसांवर ताण येतो, श्वसनक्रिया वाढते. फ्लोरिडाच्या विद्यापीठानुसार आपण विश्रांती घेत असतानाच्या तुलनेत व्यायाम करताना ७ ते १० टक्के श्वसनाचे प्रमाण वाढते.
याचा अर्थ एखादी व्यक्ती ३ ते ६ मीटरच्या अंतरात उच्छ्वासात कण बाहेर फेकू शकते. पण जोरदार व्यायाम करताना हे अंतर १५ ते २० मीटर होऊ शकते. म्हणून जिम संसर्ग होण्यासाठी जास्त धोकादायक आहे.
याशिवाय बराच व्यायाम करताना अनेकदा नाकातून, डोळ्यातून पाणी वाहते. आणि एखाद्या व्यक्तीला कोविड झाला असेल तर नाकातले पाणी पृष्ठभागावर पडू शकते आणि दुसऱ्याचा तिथे स्पर्श झाला तर कोरोना पसरू शकतो.
जिममध्ये सुरक्षित राहण्यासाठी काय करता येईल?
- जिममध्ये जाण्याआधी एका वेळी कमी जणांना बोलवा आणि तुमची वेळ याप्रमाणे नक्की करा.
- जिममध्ये स्वच्छतेची सोय आणि निर्जंतुकीकरण कसे होत आहे, याची विचारणा करा. तसेच जिममधली लॉकर रूम किंवा विश्रांतीची रूम वापरायची परवानगी आहे की नाही ते पाहा.
- तुम्हाला ग्रुप व्यायाम करायचा असेल, तर आता ती सुविधा आहे की नाही ते विचारा.
- तुमच्या जिममध्ये प्रत्येक कार्डिओ मशीनजवळ शारीरिक अंतर राखले जाईल, स्वत: ला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी जिमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. फोम, लाकडी ब्लाॅक यांसारखी उपकरणे स्वच्छ करण्यास कठीण असतात. त्यामुळे ती जिममध्ये वापरली जाणार नाहीत.
- तुम्ही आजारी पडण्याचा धोका जास्त असेल तर मात्र जिममध्ये अजिबात जाऊ नका. अशा वेळी तुम्ही तुमच्या जिमने सुरू केलेल्या ऑनलाइन क्लासेसचा लाभ घ्या.