यवतमाळ - धारदार शस्त्र आणि दगडाच्या सहाय्याने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऑक्सीजनपार्क येथे हा प्रकार उघडकीस आला. रुपेश देशभ्रतार (वय - 27, रा. उमरसरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ऑक्सीजन पार्कमध्ये फिरायला गेलेल्या काही नागरिकांना परिसरात दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी त्यांनी पाहणी केली असता, एका तरुणाचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेनंतर नागरिकांनी ही माहिती तत्काळ अवधुतवाडी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत पंचनामा केला. यात तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्राचे घाव झालेले आणि चेहऱ्याची ओळख पटू नये, या उद्देशाने वार केले होते.
हेही वाचा - धक्कादायक ! सांगलीत आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या
पोलिसांनी मृतदेहाची सखोल चौकशी केली असता, हा तरुण रुपेश देशभ्रतार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब उमरसरा परिसरात माहिती होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीसकर यांनी घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली. पुढील तपास अवधूतवाडी पोलीस ठाणे करीत आहे.