यवतमाळ - जगभरात कोरोना प्रसाराचा धोका वाढत आहे. यासाठी लोकांनी एकत्र येणे, गर्दी करण्याचे टाळणे आवश्यक आहे. मात्र, लोकांकडून याबाबतीत निष्काळजीपणा होत असल्याचे समोर आले आहे. हे टाळण्यासाठी सरूळ (ता. बाभूळगाव) येथील गावकऱ्यांनी एक शक्कल लढवली आहे. गावातील सिमेंटची बाकडी, इतर सर्व बसण्याच्या ठिकाणी काळे ऑइल टाकून ती जागा बसता येणार नाही, अशी केली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जगभर हाहाकार माजला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात 21 दिवसांसाठी 'लॉक डाऊन' जाहीर करण्यात आला आहे. लोकांनी एकमेकांशी संपर्क आणि गर्दी टाळावी, यासाठी देश बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, लोकांमध्ये तितकीशी सतर्कता नसल्याने रिकाम्या वेळेत एकत्र येणे, गप्पा मारणे, बाहेर फिरणे असे वर्तन सुरू आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, हे लक्षात घेऊन येथील ग्रामस्थांनी स्वतःच यावर उपाय शोधला आहे.
कोरोनाचा संसर्ग कोणालाच होऊ नये, म्हणून सरूळ गाव बंद केले आहे. तसेच, झरीजामनी तालुक्याती खातेरा येथील गावकऱ्यांनी यवतमाळ आणि चंद्रपूरला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील पुलावर काटेरी कुंपण टाकून प्रवेशबंदी केली आहे. पुढील 21 दिवसांसाठी अशी उपाययोजना केली असल्याचे गावकरी सांगत आहेत. गावातील कुणालाच कोरोनाची लागण होऊ नये या दृष्टीने गावच्या वेशीवर काटे-कुटे आणि बसण्याच्या ठिकाणी काळा पेंट टाकून प्रतिबंध केला आहे.