यवतमाळ - सीएए कायद्याला विरोध दर्शवत सर्वप्रथम दिल्ली येथील शाहीन बागच्या महिलांनी धरणे आंदोलन सुरू केले. त्याच धर्तीवर यवतमाळात अंजुमन उर्दू शाळेच्या प्रांगणात 'शाहीन बाग' आंदोलनाला सुरुवात झाली आहे. जीव गेला तरी चालेल आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही, असा निर्धार महिलांनी केला.
हेही वाचा - 'महिला अत्याचारांच्या घटनेत टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई'
यावेळी महिलांनी घोषणाबाजी करत सीएए आणि एनआरसीला तीव्र शब्दात विरोध केला. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने तिरंगा ध्वज लावण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून सीएए कायदा रद्द व्हावा, एनआरसी, एनपीआर थांबवावे, जेएनयू येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.
सीएए कायद्यात मुस्लीम समाजाचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. देशात अनेक समस्या आहेत, त्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या महिलांनी केली. सीएए कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.