यवतमाळ - खाणीमध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील मुडाणा येथे घडली आहे. लक्ष्मण दिलीप शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुडाणा येथील निजधाम आश्रम संस्थेत दहावीमध्ये शिकत होता.
यवतमाळमध्ये खाणीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय मार्गाच्या चौपदरीकरणासाठी खासगी कंट्रक्शन कंपनीने मुडाणा शिवारातील शासकीय ई-क्लास जागेत मुरूम उत्खननासाठी खाणकाम केले आहे. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याने ही खाण सध्या तुडुंब भरली आहे. लक्ष्मण शिंदे हा विद्यार्थी अन्य काही मित्रांसोबत पोहण्यासाठी खाण्यातील पाण्यात उतरला परंतू पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो गटांगळ्या खाऊ लागला. इतर मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरड केली परंतु मदतीसाठी आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे लक्ष्मणचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
खासगी कंट्रक्शन कंपनीने मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन केले व चुकीच्या जागी खदान खोदली त्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करत कंपनीच्या संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी महागाव पोलिसांकडे तोंडी तक्रार दाखल केली. परंतू महागाव पोलिसांनी ही तक्रार बदलून गुन्हा बर्किंग केल्याचा आरोप मृतकाच्या पालकांनी केला आहे.
मुडाणा येथे ई-क्लास जमिनीमधून दोन हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्याची परवानगी कन्ट्रक्शन कंपनीने काढली होती, अशी माहिती तहसीलदार निलेश मडके यांनी दिली. परंतु ही खाण नेमकी ठराविक जागेत खोदण्यात आली आहे का, याची चौकशी करण्याचे आदेश यंत्रणेला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.