यवतमाळ-जिल्ह्यात जून महिन्यात दडी मारल्यानंतर पावसाने सध्या दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना युरिया खताची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र, जिल्ह्यात यंदा खरिपाच्या सुरुवातीलाच युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणे, बियाण्यांचा काळाबाजार आणि आता खताची टंचाई यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 20 हजार मेट्रिक टन युरियाची तूट आहे. मागणीच्या तुलनेत युरियाचा पुरवठा कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात यंदा नऊ लाख हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी झाली. त्यासाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशक आदींचे नियोजन केल्याचा दावा कृषी विभागाने केला होता. मात्र, हे नियोजन कागदोपत्रीच असल्याचे पुढे येत आहे. आधी बोगस बियाणे त्यानंतर सोयाबीन बियाण्याचा कृत्रिम तुटवडा सोबतच उगवण क्षमता नसलेले सोयाबीन बियाण्यांची विक्री व आता युरिया खताचा कृत्रिम तुटवडा असे एकामागून एक संकट शेतकऱ्यांवर कोसळत आहे. जिल्ह्याला आतापर्यंत 17 हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे.
गतवर्षी यावेळेपर्यंत 36 हजारांहून अधिक मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला होता. त्यातुलनेत सद्यस्थितीत 20 हजार मेट्रिक टन युरियाची कमतरता आहे. आता पुढे आणखी युरियाची मागणी वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी बोगस खत देखील मारले जाण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत कृषी विभाग कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही.
सोयाबीनची साठेबाजी करणाऱ्यांवर, उगवण शक्ती नसलेले बियाणे विकणाऱ्यांवर यवतमाळ कृषी विभागाने अजूनही कारवाई केली नाही. शेतकऱ्यांच्या जवळपास अडीच हजार तक्रारीवर पंचनामा झालेला नाही.त्यामुळे खताची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांना तरी आवर घातला जाईल का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.