यवतमाळ - कोरोना विषाणू संदर्भात शासनाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. या अनुषंगाने प्रशासनाने अनेक आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी अतिशय काटेकोरपणे केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना कोरोना संदर्भात अद्ययावत व अचूक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी एमडी सिंह यांच्या अभिनव संकल्पनेतून जिल्हास्तरीय डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे.
![जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय डॅशबोर्डची अभिनव संकल्पना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ytl-02-coll-m-d-singh-byte-vis-7204456_19042020210206_1904f_1587310326_292.jpg)
जिल्हाधिकारी कार्यालयात या डॅशबोर्डचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आरपी सिंह, महाविद्यालयाचे कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, राष्ट्रीय सुचना व माहिती केंद्राचे राजेश देवते आदी उपस्थित होते. टेक्नोसॅव्ही व कम्प्यूटर सायन्समध्ये इंजिनीअर, व्यवस्थापन शास्त्रात पदव्युत्तर (एमबीए) तसेच पाच वर्षे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात खाजगी नोकरी करणारे जिल्हाधिकारी एमडी सिंह यांनी स्वत:च्या संकल्पनेतून डॅशबोर्डची निर्मिती केली आहे.
कोरोना संदर्भात नागरिकांना एकदम सहजरित्या व सोप्या भाषेत एकत्र माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ttps://yavatmal.gov.in/ हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. यावर क्लिक केल्यानंतर नागरिकांना अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी एमएस पॉवरपॉईंट आणि एमएस एक्सल इंटरफेस यांचा उपयोग करून सदर डॅशबोर्डवर माहिती अपलोड करण्यात येईल. जिल्हाधिकारी स्वत: दिवसातून दोनवेळा यावर माहिती अपलोड करणार आहेत.
डॅशबोर्डवर मिळणार ही माहिती -
1 जानेवारी 2020 पासून विदेशातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्या, गृह विलगीकरण तसेच संस्थात्मक विलगीकरणात असलेले विदेशी नागरिक, कोव्हीड रुग्णालयाची संख्या, या रुग्णालयात भरती असलेल्या नागरिकांची संख्या, कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटर संख्या, तेथे असलेल्या नागरिकांची संख्या, तपासणीकरीता नागपूरला पाठविलेल्या नमुन्यांची संख्या, प्राप्त-अप्राप्त नमुन्यांचे अहवाल, पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या, प्राप्त झालेले एकूण निगेटिव्ह रिपोर्ट, जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह असलेले एकूण रुग्ण, कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या, आत्तापर्यंत सुट्टी देण्यात आलेले कोरानाबाधित रुग्ण आदी बाबींची माहिती या डॅशबोर्डवर नियमित अपलोड करण्यात येईल.