यवतमाळ - पांढरकवडा आगाराच्या बसमध्ये मंगळवारी सायंकाळी मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. एका महिलेने चालत्या एसटी बसमध्येच बाळाला जन्म दिला. त्यानंतर कोणाचेही आपल्याकडे लक्ष नाही, याची खात्री करून ती महिला नवजात बाळाला तिथेच सोडुन पसार झाली.
पांढरकवडा आगाराची एसटी बस (एमएच ०६ एस ८८२४) पांढरकवडा बसस्थानकातून ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन यवतमाळकडे निघाली होती. सायंकाळची वेळ असल्याने व बस चालवायला अडथळा होत असल्याने चालकाने बसमधील दिवे बंद केले. बसमध्ये एक गर्भवती महिला प्रवाशी होती. अंधारातच त्या गर्भवती महिलेची प्रसुती झाली आणि तिने चालत्या बसमध्येच एका बाळाला जन्म दिला.
पण या महिलेने प्रसुतीचा व त्या प्रसुती कळेचा जराही अंदाज बसमधील इतर प्रवाशांना येऊ दिला नाही. तसेच त्या महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर आपल्याकडे कुणाचेच लक्ष नाही याची खात्री करुन स्वत: च्या पोटच्या गोळ्याला बसमध्येच बेवारस टाकून पसार झाली.
ही बस यवतमाळ बसस्थानकावर आली असता सर्व प्रवासी बसमधुन उतरले. मात्र, त्या नवजात बाळावर एकाही प्रवाशांचे लक्ष गेले नाही. ड्युटी संपल्यामुळे बसमधील वाहक व चालक बस खाली उतरायला निघाले तेव्हा त्यांच्या पायापर्यंत रक्ताची थारोळी आलेली दिसली. तेव्हा त्यांनी बसमधील मधोमध मागील आसनाखाली बघितले तर एक नवजात बाळ दिसले. त्यावेळेस त्यांनी बसस्थानकावर उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यांनी बाळाला बघितले असता बाळ मृत अवस्थेत होते.
यवतमाळ आगारात कार्यरत बसस्थानक प्रमुख गोविंद उजवने, सहायक वाहतूक निरीक्षक दिगांबर गावंडे व कर्मचारी जितेंद्र दवारे तसेच सदर बसचे चालक-वाहक यांनी वडगाव पोलीस ठाणे येथे जाऊन झालेल्या घटनेबाबत कल्पना दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी बसस्थानक गाठुन घटनेचा पंचनामा केला. मृत नवजात बाळ जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुपूर्द करण्यात आले. बाळाला जन्म देणाऱ्या आईचा शोध वडगाव पोलीस ठाणे घेत आहे.