यवतमाळ - मान्सून आठवडाभर उशीरा येत असताना दुष्काळाचे भयावह चित्र दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. पाणीटंचाई असल्याने विहिरीतून पाणी काढताना तोल गेल्याने महिलेचा खोल विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना महागाव तालुक्यातील माळेगाव येथे घडली आहे. विमल साहेबराव राठोड (४२) असे मृत महिलेचे नाव आहे.
माळेगाव येथील नागरिकांना बाराही महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाईसाठी भरमसाठ खर्च करून नियोजन शून्य उपाययोजना केल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. माळेगाव हे माळपठारावर वसलेले दोन हजार लोकसंख्येचे छोटे गाव आहे. येथे शेती आणि शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणारी वस्ती आहे.
सरकारचे पैसे लाटण्यासाठीच विहिरींचे अधिग्रहण ?
पाणीटंचाई निवारणासाठी दरवर्षी चार खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाते. पण त्या विहिरीला अपुरे पाणी आहे. फक्त सरकारचे पैसे लाटण्यासाठीच विहिरींचे अधिग्रहण केले जात असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे. गावामध्ये पाणी पुरवठ्याकरिता तब्बल पाच विहीरी आहेत. पण एकाही विहिरीला पाणी उपलब्ध नाही. शिरपूर शिवारात पाणी पुरवठ्याची नवीन विहीर खोदण्यात आली. त्या विहिरीचे पाणी गावातील विहिरीत टाकून गावातील महिला व पुरुष ते पाणी काढण्यासाठी त्याठिकाणी गर्दी करतात.
ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षित धोरण-
मागील महिन्याभरापासून तांत्रिक अडचणीमुळे विहिरीत पाणी सोडण्यात आले नाही. अशा परिस्थितीत त्या विहिरीच्या तळाशी आसलेले पाणी काढण्यासाठी विमल राठोड या गेल्या होत्या. ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षित धोरण यामुळे महिलेचा बळी गेल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे. मृत महिलेच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले व पती असा परिवार आहे.