यवतमाळ - वणी येथील नांदेपेरा मार्गावरील वांजरी शेत शिवारात एका विवाहित महिलेला दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत महिलेचे नाव जया मनोज आवारी (वय - 32) असे असून या अद्याप हत्येमागील कारण अस्पष्ट आहे.
दोन मुलांसह किरायाने राहात होती
मृत महिला वणी तालुक्यातील पिंपळगाव येथील असून काही वर्षांपूर्वी तिचे स्थानिक तरुणाशी लग्न झाले होते. यानंतर ती पतीसोबत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे राहत होती. मात्र मागील सहा वर्षांपासून ती पतीपासून विभक्त झाली होती. तेव्हापासून वणी येथील बस डेपो मागील पटवारी कॉलनीमध्ये दहा व सहा वर्षीय मुलांसह ती भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होती. गुरुवारी रात्री भावाकडे जात असल्याचे ती सांगून ती बाहेर गेली मात्र, बराच वेळ न घरी परतल्याने परिचित व नातेवाईक तिचा शोध सुरू केला.
सालगड्याला दिसला मृतदेह
वणी-नांदेपेरा रस्त्यावरील रसोया फॅक्टरीपासून काही अंतरावर बडवाईक यांचे शेत आहे. सकाळी त्यांच्या शेतातील साल गड्याला गोटातून बैल बाहेर काढत असताना एका महिलेचा मृतदेह आढळला. याची माहिती त्यांनी मालकाला दिली आणि मालकाने तत्काळ वणी पोलिसांशी संपर्क साधला. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या महिलेवर दगडाने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.