यवतमाळ- पाणी फाऊंडेशन पुरस्कृत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला आठ एप्रिलच्या मध्यरात्री श्रमदानाने सुरुवात झाली. ' एकजुटीने पेटलं रान, तुफान आलया' अशी स्थिती तासलोट या गावात निर्माण झाली आहे. सकाळी उठून आपली शिदोरी गाठीशी बांधून पिण्याच्या पाण्याचा पिंप डोक्यावर लादून गावातील मंडळी भल्या पहाटे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी लढायला सज्ज होतात. यात थक्क करणारी एक दिव्यांग स्त्री पण आहे. तिला हात नाहीत. पण तिचा काम करण्याचा सळसळता उत्साह बघून धडधाकट माणसांची सुद्धा तिच्यासमोर शरमेने मान खाली जाईल.
लक्ष्मी टेकाम असे या दिव्यांग स्त्रीचे नाव आहे. दोन्ही हातांनी दिव्यांग असलेली लक्ष्मी टेकाम हातात फावडे धरून, पायाने गोटे वेचून त्या बांधावर टाकतात. रोज तीन ते चार तास त्या काम करतात. भावी पिढीला पाण्याचा त्रास होऊ नये एवढीच तिची सार्थ अपेक्षा आहे ही जिद्द येथील लोकांमध्ये दिसून येते. त्यामुळेच हे गाव वॉटर कप फाउंडेशनच्या स्पर्धेत महाराष्ट्रातून पहिले येईल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तासलोट हे कळंब तालुक्यातील आदिवासी बहुल गाव आहे. या गावाची लोकसंख्या अवघी ८२ एवढी आहे. एकूण २१ कुटुंब या गावात राहतात. डोंगरावर वनरांईनी नटलेले हे गाव आहे. पिण्याच्या पाण्याची येथे मुळीच कमतरता नाही. पाण्याची मोठी टाकी प्रशासनाने बांधून दिली आहे. अगदी २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. मग हे अशिक्षित गावकरी जमिनीत पाणी मुरविण्यासाठी का सरसावली, हा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. आज जरी येथे पाणी मुबलक जरी असेल तरी भविष्यातही ही पाण्याची मुबलकता अशीच राहावी, यासाठी गाव पेटून उठले आहे.
तासलोट या गावाची क्षमता बघता वॉटर कप स्पर्धेत त्यांना श्रमदानाने ५०० घनमीटर आणि मशिनने २७००० घनमीटर इतके लक्ष्य देण्यात आले. पण येथील गावकऱयांनी एकजुटीने काम करीत श्रमदानाने हे लक्ष्य अवघ्या आठ दिवसातच पार पाडले. स्पर्धा संपेपर्यंत श्रमदानाने ६००० घनमीटर काम पूर्ण होईल, असा विश्वास गावकऱ्यांना आहे. मशीनने होणारे काम पैशांच्या अभावी मागे पडले आहे. पण काही सामाजिक संघटना समोर येऊन हे ही लक्ष्य पूर्ण होईल, असा विश्वास या गावकऱ्यांना आहे. या गावकऱयांचा उत्साह बघून अगदी प्रतिकूल वातावरणातही वॉटर कप स्पर्धेत हे गाव आपली ठळक नोंद करेल यात शंका नाही.
निवासी उप जिल्हाधिकारी ललीतकुमार वर्हाडे यांच्याकडून घेतली प्ररेणा
गावातील आबालवृद्ध सूर्यकिरणे पडण्यापूर्वीच कामावर हजर होतात. त्यांनी निवासी उप जिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांच्या कडून प्रेरणा घेतली आहे. श्री वर्हाडे दररोज सकाळी सहाला कार्यस्थळी हजर असतात. सहा ते नऊ तीन तास काम करूनच ते परत ड्यूटीवर येतात. दर रविवारी येथे महाश्रमदान असते. या रविवारी दाते महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचा चमू, संकल्प व प्रतिसाद फाउंडेशनची चमू श्रमदानाला आला होता.