यवतमाळ - मंत्रालयात बसून भटक्या समाजाच्या वेदना समजू शकत नाही. म्हणून आपण प्रत्यक्ष लोकांना भेटायला आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायला आलो आहोत, असे म्हणत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील भटक्या समाजातील, तसेच रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या समाजातील लोकांना प्रत्यक्षात भेट देत त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. यावेळी वडेट्टीवार यांनी शिक्षणातूनच भटक्या समाजाचा विकास होणार असल्याचे म्हटले.
भटक्या, गरीब वंचितांच्या समस्या समजावून घेत, त्यानुसार भटक्या समाजाकरिता शासनाचे नवीन धोरण तयार करणार आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... अहमदाबाद : सामूहिक विवाह सोहळ्यात 1 हजार 101 जोडपी विवाहबद्ध
भटक्या समाजासाठी घरकुलाचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहोत. मात्र, समाजाचा विकास हा फक्त घरे बांधून होत नाही. त्यासाठी मुलांना योग्य शिक्षण व चांगले संस्कार देणे गरजेचे आहे. भटक्या जमातीच्या मुलांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर नामांकित इंग्रजी शाळेतून शिक्षण देण्यासाठी राखीव जागेची तरतूद करण्यात येईल. तसेच शिक्षित मुलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण योजना राबवणार असल्याचेही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा... सूर्यमुखींनी लवकर उठावे.. अजित पवारांच्या जितेंद्र आव्हाडांना कानपिचक्या
मुले शाळेत जातात का ? आश्रमशाळेत का नाही पाठवत ? घरकुल मिळण्यास काय अडचणी आहेत का ? संजय गांधी निराधार योजनेचे फायदे मिळतात का ? प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे मिळतात का ? आदी प्रश्न विचारून विजय वडेट्टीवार यांनी भटक्या समाजातील लोकांची चौकशी केली. तर नाथजोगी समाज कधीपर्यंत भिक्षा मागून जगणार, सतत भटकंतीमुळे या भटक्या समाजाला अधिवासाचे दाखले मिळत नाही. त्यामुळे घरकुले मिळत नाही. दगड फोडणे, माती खोदणे हे वडार समाजाचे परंपरागत व्यवसाय यांत्रिकीकरणामुळे बंद पडले आहेत. रोजगाराच्या दुसऱ्या संधी नाही, अशा समस्या यावेळी या समाजातील लोकांनी मांडल्या.