यवतमाळ - वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी विशेष महत्वाचा आहे. मात्र, यावर्षी इतर सणांप्रमाणे वटसावित्रीच्या सणावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हातील महिलांनी कोरोना संसर्गाबाबत खबरदारी बाळगत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा सण साजरा केला.
वृक्ष व प्राणीमात्रांची पूजा व संगोपनाला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेचे व्रत पाळत उपवास करतात.
वटसावित्रीचे औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासह आयुर्वेदात महत्वाचे स्थान प्राप्त असलेल्या वडाचे पूजन केले. सोबतच, एकमेकीला वडसावित्रीच्या शुभेच्छा देत झाडे लावून त्याचे संगोपन करण्यासह झाडे लावा झाडे जगवाचा संदेश दिला. तसेच, कोरोनाबाबत दक्षता म्हणून मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहनही केले.