यवतमाळ - पांढरकवडा तालुक्यातील मांडवी शेत शिवारात वाघाचा हल्लात दोन व्यक्ती जखमी झाल्याची घटना 11 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. यातील एक व्यक्ती गंभीर जखम असल्याने त्याला उपचारासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिनेश मडावी आणि इंद्रदेव किनाके, असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहे.
जागलीसाठी गेले होते शेतात -
तालुक्यातील पाटणबोरी गावालगत असलेल्या मांडवी या गावातील दिनेश मडावी व इंद्रदेव किनाके हे दोघेजण शेतामध्ये हरभरा या पिकाच्या जागलीसाठी गेले होते. दरम्यान, वाघाने दिनेश मडावी याच्यावर हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी इंद्रदेव किनाके गेला असतास, त्याच्यावरही वाघाने हल्ला चढविला. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. या घटनेची माहिती गावात समजल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वनविभागाचे पथक गावात दाखल -
वाघाच्या हल्ल्यात झाल्याची माहिती वनविभागाला समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मेहरे, सहायक उपवन संरक्षक आर. के. बनसोड यांनी जखमींची भेट घेतली. दोघांनाही पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, इंद्रदेव किनाके यांच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले.
जंगलात एकटे न जाण्याचे वनविभागाचे आवाहन -
पांढरकवडा ते घाटंजी या दोन तालुक्याच्या भागामध्ये टिपेश्वर अभयारण्याचा भाग लागून येतो. या भागामध्ये नियमित वाघांचा वावर असतो. अनेकवेळा गुराखी व जनावरांवर या भागातील वाघांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे जंगल परिसरातील नागरिकांनी शेतात वा जंगलात एकटे न जाता जमावाने जाण्याचे आवाहन पाटणबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मेहरे यांनी केले आहेत.
हेही वाचा - रामोजी फिल्म सिटी १८ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी होणार खुली