यवतमाळ - लॉकडाऊनच्या काळात यवतमाळ शहरात मद्य शौकिनांना दारूचा पुरवठा करण्यासाठी गॅस सिलेंडर वाहतुकीच्या वाहनाचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
गावठी दारुची विक्री करण्याच्या उद्देशाने गॅस एजन्सीच्या वाहनातून (एमएच 29 बीयु 1115) गावठी दारुची वाहतूक होत असताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. मारोती चंतपराव टेकाम आणि राहुल चंद्रकांत बिजवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अवधुतवाडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.
दत्त गॅस एजन्सीच्या वाहनात ड्रायव्हर सीटच्या बाजूला एका डबकीमध्ये 15 लिटर दारुसाठा आढळून आला. पोलिसांनी पंचासमक्ष दारुसाठ्यासह वाहन असा एकूण 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तसेच संबंधित दोघा आरोपींना अटक करुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानव्ये गुन्हे दाखल केले.