यवतमाळ - टिपेश्वर अभयारण्यातील रेडीओ कॉलर लावलेल्या T१C३ या वाघाच्या पायात दोरीचा फास अडकल्याने त्याला जखम झाली होती. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करून वाघावर औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर वाघाला जंगलात सोडण्यात आले.
टिपेश्वर अभयारण्यात रेडीओ कॉलर लावलेल्या T१C३ या वाघाच्या पायात दोरीचा फास अडकला होता. त्यामुळे त्याला जखम झाली होती. ही बाब पर्यटक यांनी २९ मे रोजी वन्यजीव विभागास निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तत्काळ त्या वाघाच्या शोधासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.
रेस्क्यू ऑपरेशन अंतर्गत डॉ. पराग निगम (शास्त्रज्ञ, भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून) यांनी जखमी T१C३ वाघास डॉर्ट मारून बेशुध्द केले. त्यानंतर डॉ. पराग निगम, डॉ. चेतन पातोंड, (पशुचिकीत्सक, पेंच व्याघ्र प्रकल्प), डॉ. अंकुश दुबे, (पशुचिकीत्सक, नागपुर) वनविभाग यांनी वाघाच्या पायातील नॉयलॉन दोरीचा फास काढून जखमेवर आवश्यक औषधोपचार केले. त्यानंतर वाघाचे स्वास्थ्य चांगले असल्याबाबत खात्री करण्यात आली. त्यानंतर वाघाला शुध्दीवर आणून जंगलात सोडण्यात आले.
टिपेश्वर अभयारण्याच्या सिमावर्ती भागात वन्यप्राण्यांच्या मांसाकरीता फासे लावुन शिकार करण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे संवेदनशील क्षेत्रात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून फासे लावण्याऱ्या आरोपीचा शोध घेण्याची काम युद्ध पातळीवर सुरू आहे.