यवतमाळ - मागील दोन दिवसापासून कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 80 वर थांबलेली असताना रविवारी पुन्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 81 वर गेली आहे.
रविवारी दिवसभरात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 39 रिपोर्ट्स प्राप्त झाले. यापैकी दिलासा देणारी बाब म्हणजे 38 रिपोर्ट्स नेगेटिव्ह तर एका जणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 81 झाली आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती मागील काही दिवसांपासून आयसोलेशन वार्डमध्ये भरती होती. याव्यतिरिक्त दोन जणांचे रिपोर्ट 14 दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आले असले तरी एक्टिव पॉझिटिव्ह संख्या सध्यास्थितीत 81 आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या व संचारबंदीच्या काळात अनावश्यकपणे बाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीकरीता बाहेर पडलो तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये. तसेच मास्कचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.