यवतमाळ - शहरातील रहिवासी असलेल्या एका 48 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 52 झाली आहे. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 35 जण भरती आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 215 आहे. यापैकी 156 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज प्राप्त एकूण 235 रिपोर्टपैकी एक पॉझिटिव्ह तर 229 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पाच नमुन्यांचे अचूक निदान न झाल्याने सदर नमुने पुन्हा तपासण्यात येणार आहेत. निगेटिव्ह आलेल्या रिपोर्टमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पाच रिपोर्ट, कोव्हीड केअर सेंटरमधील 72, यवतमाळच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षातील सहा, दारव्हा येथील 46, नेर येथील 65, दिग्रस येथील 22 आणि पुसद येथील 13 रिपोर्टचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाने सुरूवातीपासून आतापर्यंत 3 हजार 363 नमुने तपासणीकरीता पाठविले असून, यापैकी 3 हजार 323 प्राप्त तर 40 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 108 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांची दारव्हा आणि नेर येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट-
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी या भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाधिकारी रोज प्रतिबंधीत क्षेत्रात दाखल होऊन येथील परिस्थतीवर गांभिर्याने लक्ष देत आहेत. शनिवारी त्यांनी दारव्हा आणि नेर येथील प्रतिबंधीत क्षेत्राला भेट देऊन आढावा घेतला.
आतापर्यंत दारव्हा येथे सात पॉझिटिव्ह रुग्णांच्या अगदी निकटच्या संपर्कातील 32 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर येथील 178 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आणखी 200 जणांचे नमुने तपासणीकरीता पाठवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत यंत्रणेला दिले आहेत. तसेच संपर्कातील जवळपास 400 लोकांना पाच ठिकाणच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, अशाही सुचना त्यांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अधिकारानुसार त्यांनी दारव्हा येथे नवीन टीम कार्यरत केली आहे. यात उपविभागीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) दळवी, तहसीलदार म्हणून डॉ. संतोष डोईफोडे, तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. बेग तसेच चंदेल आणि केदार यांचा समावेश आहे. ही टीम 24 बाय 7 कार्यरत राहून येथे काम करणार आहे.