यवतमाळ- प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाला एका ट्रकमधून जप्त करण्यात आला आहे. तांदळाची वाहतूक करत असल्याचा बनाव करून हा तंबाखू साठा कारंजा येथे नेण्यात येत होता. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर-तुळजापूर मार्गावरून एका ट्रकमधून गुटखा तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी पांढरकवडा मार्गावरील पुलाजवळ सापळा रचला. ट्रकची पाहणी केली असता, सुगंधित तंबाखू व पानमसाला आढळून आला.
कारवाईत पोलिसांनी 32 लाख 64 हजार रुपये किंमतीचा पानमसाला, सुगंधित तंबाखू व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण 52 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अनवर खान सलाउद्दीन खान (24, रा. बिदर), अब्दुल मुक्तार समी (20) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा साठा कारंजा येथील जाफर अली याच्याकडे जात होता, अशी कबुली चालकाने दिली. तिघा आरोपींविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन, एसडीपीओ माधुरी बाविस्कर, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मिनल कोयल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे, पीएसआय मंगेश भोयर, सचिन पवार, पवन राठोड, योगेश गटलेवार यांच्यासह अन्न औषध व प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे, संदीप सूर्यवंशी यांनी केली.