यवतमाळ - झरीजामनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मांडवी बीट व लगतच्या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. या भागात शेतात काम करणाऱ्या मजुरांना या वाघाचे दर्शन होत असून एका गाईची शिकार देखील केली आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या पेरणी, खुरपणी, डवरणी असे काम सुरू आहेत. मात्र, अशातच टिपेश्वर अभयारण्यातील वाघाचा मुक्त संचार सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून पांढरकवडा विभागातील अंधारवाडी येथे या वाघाचा वावर आहे. गुरुवारी मांडवी शिवारात हा वाघ आढळला असून शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कृष्णा कणाके, व्यंकटेश दंडाजे यांच्या शेतात हा वाघ दिसून आला. तसेच दुपारच्या सुमारास याच भागातील विजय कुमरे यांच्या गाईची शिकार केली. याबाबत पांढरकवडा व झरीजामनी वनविभागाला माहिती दिली असून वनविभागाची चमू या वाघावर लक्षे ठेवून आहे.