यवतमाळ - जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी क्राइम मीटिंगमध्ये सर्व ठाणेदारांना दिले होते. तरीही रास्त दुकानात छापा टाकून कारवाई न करता तीस हजाराची लाच स्वीकारली, अवैध व्यवसायाला पाठबळ दिले, असा ठपका ठेवून डीबी पथकातीन तीन पोलीस कर्मचार्यांना निलंबित केले आहे. नितीन वास्टर, अरविंद कोकाटे, अरविंद जाधव अशी निलंबित पोलिस कर्मचार्यांची नावे आहे.
तिघांवर शिस्तभंगाची कारवाई
जुगार, गुटखा, अवैध व्यवसायावर छापा टाकून लाचेची मागणी करणे, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस न आणता स्वत:साठी पैशाची मागणी करणे, पोलीस ठाण्याची गोपनीय माहिती पुरविणे, डीबी पथकात नेमणुकीसाठी राजकीय दबाव आणणे, अवैध धंदे व्यावसायिकांच्या संपर्कात राहून पार्टनरशिपमध्ये ठेवण्यास प्रवृत्त करणे, चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे, छापा टाकण्यासाठी बाहेरचे पोलीस आल्यास माहिती पुरविणे आदी बाबींची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी दिग्रस पोलीस ठाण्यात कार्यरत तिघांवर कारवाई केली. शिस्तभंगाचा ठपका तिघांवर ठेवण्यात आला.
चाळीस हजाराच्या लाचेची मागणी
गवळीपुरा भागात रास्त धान्य दुकानात छापा टाकला होता. कारवाई न करता गुलाब नौरंगाबादे यांच्या मुलाकडे 40 हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यातील तीस हजार रुपये स्वीकारले. एसीबीकडे तक्रारदार गेल्याची माहिती मिळताच तिघेही रजेवर गेले. या घटनेची गंभीर दखल पोलीस अधीक्षकांनी घेतली. वरिष्ठांच्या आदेशाला डावलून अवैध धंद्यांना पाठबळ देणे तिघांनाही चांगलेच भोवले आहे.
हेही वाचा - गणपतीपुळे मंदिरात नियमांचे पालन; पण मंदिराबाहेर नियम धाब्यावर