यवतमाळ - मागील काही दिवसांपासून यवतमाळ शहरात आणि जिल्ह्यात चोरीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपुर्वीच पोलिसांनी चोरट्यांच्या एका टोळीला अटक करून तेरा गुन्हे उघडकीस आणले. तरीही चोरीच्या घटना सुरूच आहेत. 'सत्यनारायण लेआउट' येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरी चोरी करून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लंपास केला.
गणेश शिवराम जाधव हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. काही दिवसांपुर्वीच जाधव यांच्या मुलाचा विवाह झाला. त्या निमित्त एका नातेवाईकाने त्यांना जेवण्यासाठी बोलावले होते. जाधव कुटुंबिय नातेवाईकांकडे जेवणासाठी दारव्हा येथे गेले होते. घरी कुणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. कपाटात असलेले सोन्याचे दागिने, रोख ६५ हजार रुपये असा एकूण ५ लाख २१ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. जाधव कुटुंब घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी तत्काळ अवधूतवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
हेही वाचा - एक वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनाम केला. श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर, ठाणेदार आनंद वागतकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाची गणेश जाधव यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लवकरात लवकर चोरट्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.