यवतमाळ - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला समाजकारणाचे धडे दिले. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असा मंत्र दिला. त्यामुळे विद्यार्थी जीवनापासून आम्ही समाजसेवेचे व्रत स्वीकारले आहे. त्यामुळेच आम्ही गरजूंसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन डॉक्टर आणि गरीब रुग्णांच्या मधील दुवा बनण्याचा प्रयत्न करीत असतो. बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार आम्ही रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानतो. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी केले. शिवसेनातर्फे भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
शिबिरात हजारावर रुग्णांची नोंदणी-शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे (वर्धा) डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ भव्य मोफत हृदयरोग तपासणी व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात हजारावर रुग्णांनी नोंदणी केली असून आज चारशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील 123 रुग्णांना ऍन्जिओग्राफी करण्यासाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता असल्यास या रुग्णांची मोफत एन्जोप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबीर ठरले रुग्णांसाठी उपयुक्त-
नोंदणी करण्यात आलेल्या रुग्णांची तपासणी करून ऍन्जिओग्राफी, एन्जोप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. छातीमध्ये वेदना, श्वास घेताना त्रास, छातीत भरल्यासारखे वाटणे, चालताना धाप लागणे, पायावर सूज येणे, उच्च रक्तदाब व मधुमेह आजार असल्यास रुग्णांची तपासणी करून या शिबिरात औषध औषधोपचार करण्यात आले. शिबीर स्थळी हृदयरोग तपासणी, ब्लड शुगर, ईसीजी, 2-डी इको, टीएमटी सुद्धा करण्यात आली. त्यामुळे हे शिबीर रुग्णांसाठी उपयुक्त ठरले.