यवतमाळ - 'साहेब आम्ही किती मोर्चे काढले, तरी तुम्ही आमची हाक का ऐकत नाही? घरी दोन पोरं आणि नवरा तिघेही दारू पिऊन मारतात, मी असा किती दिवस मार खाऊ? तुमच्या पाया पडते दारू बंदी करा' ही आर्त मागणी आहे घाटंजी तालुक्यातील मोतीबाई तोडसाम यांची. ही मागणी करताना मोतीबाईंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. त्यांना पाहून जयंत पाटीलही भावूक झाले.
हेही वाचा - ''फोन टॅपिंगचे कोणतेही आदेश दिलेले नव्हते, सरकारने चौकशी करावी''
गेल्या ५ वर्षांपासून 'स्वामिनी' संघटनेच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील महिला आणि सुजाण नागरिक दारूबंदीची मागणी करीत आहेत. या दारुबंदीसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनुकूल असून त्यांनी याबाबत स्वामिनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले. यवतमाळमध्ये दारूबंदी करावी, अशा आशयाचे पत्रही पाटील यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठविले आहे, अशी माहिती स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी दिली.
हेही वाचा - जन्म आणि मृत्यूचीही वेळ एकच, लव-कुशचा असा झाला अंत
यवतमाळ जिल्हा दारूबंदीसाठी २०१५ सालापासून आंदोलन सुरू आहे. अनेक आंदोलनानंतरही भाजप सरकारच्या काळात या मागणीला न्याय मिळाला नाही. याच कालावधीत राष्ट्रवादी पक्षाची 'हल्लाबोल' यात्रा यवतमाळ जिल्ह्यातून जात असताना स्वामिनीच्या २०० महिलांनी यात्रा अडवून दारूबंदीचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी खासदार सुप्रिया ताई, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्ह्यात दारूबंदीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १७ जुलै २०१८ च्या नागपूर पावसाळी अधिवेशनात जयंत पाटील यांनी स्वामिनीच्या मागणीची दखल घ्यावी, अशी सरकारला विनंती केली होती. 'भाजपा सरकारने जिल्ह्यात दारूबंदी केली नाही, तर आमचे सरकार येताच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करू, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले होते. याच आश्वासनाची पूर्तता करावी, यासाठी स्वामिनीचे शिष्टमंडळ गुरुवारी जयंत पाटलांना भेटले.
हेही वाचा - भाजपचा नेता म्हणतो... पोहे खाण्याच्या पद्धतीवरून समजले 'ते' बांगलादेशी घुसखोर
जिल्ह्यात दारूबंदीसाठी स्वामिनी या संघटनेने आजपर्यंत अनेक आंदोलने केली. या आंदोलनाला पीडित कुटुंबांनी पाठिंबाही दर्शवला होता. यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींनी दारूबंदीचा प्रस्ताव पारित केला आहे. 'दारूविक्रीपासून मिळणारा महसूल राज्य सरकारसाठी महत्त्वाचा आहे. असे असले तरी व्यसनांमुळे असंख्य कुटुंबांची वाताहात होत आहे' अशी व्यथा स्वामिनीच्या शिष्टमंडळाने जयंत पाटलांकडे मांडली. या शिष्टमंडळात स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार, विभागीय संघटक मनीषा काटे, सरोज देशमुख, धीरज भोयर, संजीवनी कासार, रेखा उदे, मोतीबाई तोडसाम यांचा समावेश होता.