यवतमाळ - महागाव तालुक्यातील गुंज येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केली आहे. शुक्रवारी(4 जून) पहाटेच्या सुमारास प्रसाधन गृहाच्या खिडकीच्या गजाल गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती पुसद शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. बळीराम मोतीराम राठोड (55) असे मृताचे नाव आहे.
खासगीत खर्च जास्त असल्याने शासकीय रुग्णालयात भरती
मृत बळीराम मोतीराम राठोड हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यास पुसद येथील एका खासगी रुग्णालयामध्ये 28 मे ला भरती करण्यात आले होते. मात्र, खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक यांनी बळीराम राठोड यास पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय येथे 30 मे ला भरती करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, 3 जून रोजी पहाटे तीन वाजता बळीराम राठोड यांनी प्रसाधन गृहातील खिडकीच्या लोखंडी गजाला शेल्याने (उपरणे) बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली. मृत बळीराम राठोड यांच्या पश्चात पत्नी, विवाहित 3 मुले, एक मुलगी असा परिवार आहे.