यवतमाळ - आर्णी तालुक्यातील जवळा येथील बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या वेळी 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर-तुळजापूर महामार्गवर असलेल्या जवळा गावांमध्ये अमित बार अँड रेस्टॉरंट आहे. लॉकडाऊनमुळे दारू वाहतूक व विक्री बंद आहे. यामुळे जवळा येथे अमित बार अँड रेस्टॉरंटच्या मालकाने घरी डुप्लिकेट दारू बनविने सुरू केले. यवतमाळ राज्य उत्पादन शुल्क विभागच्या अधिकाऱ्यानी गुप्त माहितीच्या आधारे अमित बार मालकाच्या घरी छापा टाकला. त्यांच्या घरात नामांकित कंपन्यांच्या डुप्लिकेट दारूने भरलेल्या बाटल्या, बाटल्यांना लावण्याची बनावट झाकणे, रिकाम्या बाटल्या, दारू निर्मिती करता लागणारे केमिकल असा 61 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, आरोपी घटनास्थळा वरून फरार झाला. फरार आरोपी अमित बार अँड रेस्टारंडचे मॅनेजर याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांच्या नेतृत्वात पुसद विभागाचे निरीक्षक राजेश तायकर, पाटील दुय्यम निरीक्षक, अविनाश पेंदोर सहायक दुय्यम निरीक्षक, महेंद्र रामटेके, संदीप दुधे यांनी केली.