यवतमाळ - 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना व 45 ते 60 वयोगटातील ज्यांना गंभीर आजार आहेत, अशा नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. दरम्यान यवतमाळमध्ये या पार्श्वभूमीवर 7 खासगी रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय व पाटीपुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी 150 ते 200 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या लसीकरणाला जेष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याचे पहायला मिळत आहे.
45 ते 60 वयोगटातील नागरिकांना आजाराचे प्रमाणपत्र आवश्यक
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 45 ते 60 वयोगटातील ज्या व्यक्तींना गंभीर आजार आहेत, त्यांना देखील कोरोनाची लस देण्यात येत आहे. मात्र अशा व्यक्तींना लस घ्यायची असल्यास त्यांना त्यांच्या आजाराचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यांना डॉक्टरांनी दिलेले आजारी असल्याचे प्रमाणपत्र नोंदणीच्या वेळी दाखवावे लागणार आहे. यात हृदयरोग, सिटीस्कॅन, एमआरआय, दहा वर्षापेक्षा जास्त काळ मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडरोग, हायपर टेन्शन किंवा डायबिटीज वरील उपचार सुरू असतील, किडनी, लिव्हर संबंधित समस्या असतील, तर तसे प्रमाणपत्र डॉक्टरांकडून घेऊन नोंदणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.