यवतमाळ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर संचार बंदी करण्यात आल्याने कामानिमित्त परराज्यात आलेल्या मजुरांची सध्या हेळसांड होत आहे. त्यामुळे गाव गाठण्यासाठी राजस्थान आणि मध्यप्रदेशकडे पायी जाणाऱ्या मजुरांना सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढे येत माणुसकीच्या कार्यातून या मजुरांना वरण, भात, भाजी, पोळी अशा प्रकारे अन्नदान केले. तसेच पिंपळखुटी चेकपोस्टवर सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी एकाच कंटेनरमध्ये त्यांना न पाठवता इतर वाहनाने जाण्यास परवानगी दिली आहे. यामुळे मजूर मिळेल त्या वाहनाने राजस्थान व मध्यप्रदेशकडे निघाले आहेत.
हैदराबाद येथे काम करणारे अनेक मजूर कंटेनरमधून कुटुंबाचा काफिला घेऊन राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी प्रवास करत होते. तेलंगणा आणि महाराष्ट्रच्या सीमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपळखुटी चेकपोस्टवर अडवण्यात आले. मात्र, गाव गाठण्यासाठी निघालेल्या या सर्व मजुरांनी २ दिवासांपासून उपाशीच प्रवास सुरू केला होती अशी माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळाली.
त्यानंतर मात्र या सामाजिक कार्यकर्त्यांनी माणुसकीचा हात पुढे करत तत्काळ या मजुरांसाठी अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला. माजी आमदार बाळासाहेब मूनगिनवार, प्रमोद कुदळे यांनी पुढाकर घेऊन. मजुरांना पुढचा प्रवास कसा व्यवस्थित करता येईल यासाठी सुद्धा मदत केली.
पिंपळखुटी चेकपोस्टवर असलेल्या आरोग्य पथकाने सर्व मजुरांची आरोग्य तपासणी केली. यानंतर कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मजुरांना कंटेनरमधून जाण्यास प्रवास करण्यास पोलिसांनी मज्जाव केला.