यवतमाळ - कुठल्याही मंत्राचे निवास्थान म्हटले, तर सकाळपासूनच कार्यकर्ते पदाधिकारी यांची सतत वर्दळ असते. मात्र, राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी जोडल्या गेल्याने मागील 8 दिवसांपासून त्यांच्या टिळकवाडी येथील निवासस्थानासमोर शुकशुकाट पाहावयला मिळत आहे. ना कार्यकर्ते, ना पदाधिकारी आणि बंगल्याचे गेटही बंद, अशी परिस्थिती मागील आठवडाभरापासून वनमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आहे.
आठ दिवसांपासून व्यवसायावर परिणाम -
वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थान असलेल्या टिळकवाडी परिसरामध्ये हॉटेल, उपाहारगृह, कॅन्टीन, फळ विक्रेते रसवंती असे लहान-मोठे व्यवसायिक आपला व्यवसाय करतात. दरवा, दिग्रस, नेर या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील व राज्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी येथे येत असल्याने यांचा चांगला व्यवसाय होतो. मात्र, मागील 8 दिवसांपासून यात कमालीची घट झाली असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
काय आहे प्रकरण -
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली.
हेही वाचा - चंद्रकांत दादा हा कसला पुरुषार्थ ? शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जयंत पाटलांचा घणाघात