यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लहान मुलांच्या उपचारासाठी तसेच सद्यस्थितीत वेगाने वाढणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वेगळ्या वॉर्डचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी करून दोन्ही वॉर्डचे त्वरीत नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.
वार्डाची केली पाहणी-
म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी वॉर्ड क्रमांक 17 मध्ये 15 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर लहान मुलांसाठीचा वॉर्ड हा 36 बेडचा राहणार आहे. एक महिन्याच्या आत लहान मुलांचा वॉर्ड तयार झाला पाहिजे. तसेच औषधी व इतर साधनसामुग्रीसाठी त्वरीत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी त्यांनी सारीचे वॉर्ड क्रमांक 18, 19, 24, 25 ची पाहणी केली. तसेच वॉर्ड क्रमांक 15 मध्ये निर्माणाधीन नवीन पाईप लाईनची पाहणी करून अशीच पाईपलाईन वॉर्ड क्रमांक 16 मध्ये सुध्दा त्वरीत करावी करण्याचे निर्देश दिले.
ऑक्सिजन प्लांट आणि सारी वॉर्डाची पाहणी-
पीसीए ऑक्सिजन प्लांटची पाहणी करतांना लवकरात लवकर दोन्ही प्लांट कार्यान्वित होणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम त्वरीत करा. तसेच येथे जनरेटर लावण्यात यावे. प्लांट असलेल्या भागात पूर्ण इमारतीसाठी जनरेटर लावण्याचे नियोजन करता येईल का, याबाबतही विचारणा केली. लिक्विड ऑक्सीजन टँक त्वरीत फाऊंडेशनवर उभा करून पाईपचे कनेक्शन लवकर करा. 20 मे पर्यंत लिक्विड ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. गिरीश जतकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र भुयार यांच्यासह ऑक्सिजन कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते.
म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे -
म्युकरमायकोसिस हा एक प्रकारचा फंगस असून नाकातून तो इतरत्र अतिशय जलद गतीने पसरतो. या रोगाची प्राथमिक लक्षणे नाकाच्या आजूबाजूला सूज येणे, ही सूज डोळ्यापर्यंत राहू शकते, नाकातून सतत पाणी वाहणे, नाकातील आतील भाग काळसर येणे अशी आहे. अशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करावा. यावर उपचार करतांना जेवढा भाग खराब झाला आहे, तेवढा भाग काढणे आवश्यक असते. तसेच रुग्णांवर चांगली देखरेख ठेवून ॲन्टी फंगल औषध देणे उपयुक्त आहे. यवतमाळ जिल्ह्यात या रोगाचे रुग्ण आढळले नसले तरी सुध्दा भविष्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नाक, कान, घसा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र गवार्ले यांनी सांगितले.