यवतमाळ- ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य कुटुंबातील असतात. या मुलांना संस्कारक्षम बनविण्यासाठी शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
हेही वाचा- 'ते' कथित बांगलादेशी राज ठाकरेंवर खटला दाखल करणार
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, प्रमुख अतिथी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील(कामारकर), सभापती विजय राठोड, श्रीधर मोहोड, जयश्री पोटे, चित्तांगराव कदम, प्रिती काकडे, पावनी कल्यमवार, रेणू शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी, शिक्षणाधिकारी दीपक चवणे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या पध्दतीचे शिक्षण देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचे जाळे उत्कृष्ट निर्माण होण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. काही समस्या असतील त्या सोडविण्याचा आपला मानस आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी 17 शिक्षकांसह, 4 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.