यवतमाळ - घाटंजी महसूल विभागाच्या तलाठी कर्मचाऱ्याचे वाहन तहसीलदार यांच्या घरासमोर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वाळू तस्करांनी वाळू वाहतुकीवर होणाऱ्या कारवाई विरोधात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हे वाहन जाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घाटंजी येथील अंबानगरी येथील तहसीलदार पूजा माटोडे यांच्या घरासमोर महसूल कर्मचाऱ्यांनी ३ फोर व्हिलर वाहने उभे ठेऊन वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. याचा फायदा घेऊन पवन बोंडे (तलाठी) यांच्या वाहनावर ( MH 32 Y 0539) पेट्रोल टाकून ते पेटवून दिले. तहसीलदारांनां ही घटना माहिती होताच पथक घटनास्थळी आले. यावेळी गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये पाहिली असता, रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी 2 व्यक्ती गाडीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवताना स्पष्ट दिसून येत आहेत. 26 फेब्रुवारीला रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान तहसीलदारांचे वाहन चालक गिरी यांना अज्ञाताने तहसीलदार पूजा माटोडे यांचे लोकेशन घेण्यासाठी फोन करून मॅडम कोठे आहेत? असा प्रश्न विचारला व फोन बंद केला. यापूर्वीही महसूल पथकाने चोरीची रेती व गाडी यापूर्वी जप्त केल्या आहे. त्याचा सूड घेण्याचा हा प्रकार आहे, असे तलाठी बोंडे यांनी सांगितले. या घटनेची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, तपास सुरू आहे.