हैदराबाद - आमिर खानच्या दंगल चित्रपटातून फोगाट बहिणींचा कुस्तीमधला प्रेरणादायी प्रवास उलगडला होता. अशीच एक कथा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत आकार घेत आहे. वडिलांकडून कुस्तीचे धडे घेतलेली यवतमाळची महिमा राठोड ही सध्या कुस्ती क्षेत्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवत आहे.
कुस्तीसारखा खेळ आणि त्यातही मुलींना उतरवायचं, हे धाडस फार कमी पालक करतात. दंगल चित्रपटातून गीता फोगाटची कथा समोर आल्यानंतर देशभरातून अशा अनेक दंगल गर्ल समोर येत आहेत. याचपैकी एक म्हणजे महिमा राजु राठोड. ती यवतमाळमधील पुसदची रहिवासी असून तिला घरातूनच कुस्तीचे धडे मिळाले आहेत. तिचे वडीलही कुस्ती खेळत होते. वयाच्या ९व्या वर्षापासून ती कुस्ती खेळतचे तिने आतापर्यंत चार राष्ट्रीय स्पर्धांसह २०० पेक्षा अधिक स्पर्धेत भाग घेतला आहे. मागील वर्षी दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने रौप्यपदकही मिळविले होते. तिचे वडील राजु राठोड यांना आधी समाजाच्या विरोधाचा तोंड द्यावे लागले. मात्र, आज तोच समाज त्यांच्या निर्णयाचे कौतुक करत आहे.
तेलंगणाच्या निजामाबादमधील सलुरा गावात स्थानिक कुस्ती स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. या स्पर्धेतही तिने पुरुष विरोधकाला हरवत विजय मिळवत ५ हजाराचे बक्षिस मिळवले. भारतासाठी ओलंपिक पदक मिळवून आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने आणि घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अशा स्पर्धेमध्ये भाग घेवून पैसै जमा करत असल्याचे तिने सांगितले.