यवतमाळ - कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आज देशव्यापी 'रास्ता रोको' आंदोलनाची हाक दिली. त्याला जिल्ह्यातील महागाव येथे प्रतिसाद मिळाला. शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कृषी कायदे मागे घेण्यासाठी देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, केंद्र सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी केले.
हेही वाचा - अमरावती-नागपूर महामार्गावर पोलीस सज्ज; शेतकरी करणार 'चक्का जाम'
न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत
शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका दिल्लीतील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. दोन महिन्यांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असून या कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका यावेळी संघटनेने घेतली आहे.
हेही वाचा - माळशिरस, मंगळवेढा तालुक्यात स्वाभिमानीकडून 'रास्ता रोको' आंदोलन