यवतमाळ - घरगुती वादातून पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचारी शंकर राठोड यांच्या पत्नीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. घरी परतलेल्या पतीने ही घटना पाहताच कीटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दरम्यान, अत्यवस्थ असलेले पोलीस शंकर राठोड यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले व त्यानंतर नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
वर्षा शंकर राठोड (30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. शंकर राठोड हे पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या शासकीय वाहनाचे चालक आहेत. शंकर राठोड हे पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलीस वसाहतीत राहतात.शुक्रवारी सकाळी त्यांचे पत्नीसोबत घरगुती वाद झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शंकर राठोड घराबाहेर पडून पोलीस ठाण्यात आले.
हेही वाचा - झारखंडमध्ये पुन्हा मॉबलिंचिंग; एकाचा मृत्यू दोन गंभीर जखमी
दरम्यान, काही वेळानंतर ते घरी परतल्यावर त्यांच्या पत्नीने पंख्याला लटकवून घेतल्याचे समोर दिसले. त्यामुळे भावना अनावर न झाल्याने ते दुचाकीवरून ते थेट कीटकनाशकाच्या दुकानात गेले व 100 मिली विषारी औषध प्राशन करून पुतण्याला फोन केला. उलट्या सुरू झाल्याने शंकर राठोडची तब्यत बिघडली. पुतण्या प्रेम राठोडने लगेच त्याला पुसद येथीलच लाईफ लाइन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळला व त्यानंतर नागपूर येथे रवाना करण्यात आले. पुसद शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमेश आत्राम याबाबतची पुढील चौकशी करत आहेत.
हेही वाचा - संतापजनक! सात वर्षीय चिमुरडीवर सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या