यवतमाळ - कोरोना संसर्गाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. यासाठी आरोग्य विभाग, पोलीस आणि शासकीय यंत्रणा रात्रंदिवस झटत आहेत. मात्र हे पुरेसे नाही, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनीही यात सहभागी होवून समाजाची जबाबदारी उचलायची आहे. याच पार्श्वभूमीवर घाटंजीकरांनी सुरु केला "आपली माणसं, आपली जबाबदारी" हा उपक्रम.
या संचारबंदीत गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी घाटंजी येथे वार्डनुसार संयोजक निवडून समित्या गठीत करण्यात आल्या. या समितीने आपल्या वार्डात संचारबंदी संपेपर्यं काम करायचे आहे. अशा सूचना मुख्य संयोजकाडून करण्यात आल्या. सुरुवातीला घाटंजी शहरातील दानशूर व्यक्तींकडून देणगी गोळा करण्यात आली. त्यानंतर हातावर पोट असणाऱ्या गरीब, मजूर अशा गरजू लोकांची यादी तयार करण्यात आली. या उपक्रमात धान्य आणि किराणा कीट तयार करण्यात आल्या. यामधे जीवनोपयोगी वस्तुंच्या ५०० किट्स तयार करण्यात आल्या. त्यामध्ये गहू ७ किलो, तांदूळ ३ किलो, तूर दाळ १ किलो, तेल ५०० मिली, साखर १ किलो, हळद १०० ग्रॅम, चटनी १०० ग्रॅम, मीठपुडा, बिस्कीट पुडा, डेटॉल साबण १, रिन साबण १ इत्यादी वस्तुंचा समावेश करण्यात आला.
अनेक गोरगरीब कुटुंबावर उपाशी राहण्याची पाळी तर येणार नाही ना ? या विचाराने माणुसकीच्या नात्याने त्यांना संकटकाळी मदत करण्यासाठी 'आपली माणसं आपली जबाबदारी' हा उपक्रम सुरू करण्यात आला. या किटचे वाटप कोणतेही लवा-जमा न करता स्वयंसेवक दुचाकीने पोहोचवत आहे. प्रशासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या किट्सचे वाटप वार्डानुसार गरजू लोकांच्या घरोघरी जावून प्रत्येक वार्ड संयोजकांनी केले.
याच उपक्रमांतर्गत समित्या आप-आपले वार्ड सांभाळत आहे. कुणाला आजार असेल, तर त्यांना आरोग्य सेवेची मदत देण्यात येत आहे. तसेच बाहेर खेडे गावतून काही लोक आले आहेत. त्यांना निवाऱ्याची गरज भासल्यास रसिकाश्रय संस्थेमधे सोय करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. या समितीमधे संयोजक महेश पवार, मनोज गवळी, अमोल ढगले, धनंजय भोरे, राजेश उदार, विशाल साबापुरे, सतीश भरडे आदी काम पाहत आहे.