यवतमाळ : कपाशी व सोयाबीनवरील पिकांवर किडीचे आक्रमण रोखण्यासाठी शेतकरी फवारणी करत आहेत. मात्र, मिक्स औषधांच्या फवारणीचा फास यंदाही शेतकर्यांभोवती कायम आहे. या हंगामात आतापर्यंत एकूण 46 शेतकरी व शेतमजुरांना बाधा झाली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत 8 शेतकरी उपचारार्थ रुग्णालयात दाखल आहेत. यातील 4 जणांची परिस्थिती गंभीर असून एक शेतकरी व्हेंटिलेटरवर आहे. तर, 38 जणांना सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असतानाच शेतकरी आर्थिक अडचणींवर मात करून खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. त्यातही सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची वाढ होत असतानाच सोयाबीन व कपाशी पिकांवर रोगाचे आक्रमण झाले. त्यामुळे, पीक वाचवण्यासाठी शेतकर्यांनी पुन्हा एकदा कीटकनाशक औषध फवारणीचा पर्याय निवडला. मात्र, फवारणीबाबत शेतकरी व शेतमजूर अजूनही अनभिज्ञ आहेत. तांत्रिकदृष्ट्या फवारणी कशी करावी, याची जनजागृती ग्रामीण भागात व्यवस्थितरित्या झालेली नाही. त्यामुळे फवारणी करताना 46 शेतकरी व शेतमजूर बाधित झाले होते. त्यांच्यावर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात 10 खाटा आयसीयूमध्ये राखीव ठेवण्यात आल्या आहे. तर, काही रुग्णांना जनरल वॉर्डात दाखल करण्यात येत आहे.
दरम्यान, राळेगाव तालुक्यातील एका बाधिताचा शासकीय रुग्णालयात तर, एकाचा परजिल्ह्यात मृत्यू झाला. मात्र, प्रशासनाकडे दोन्ही मृत्यूची नोंद नाही. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी चंद्रपूर, नांदेड, सावंगी (मेघे), सेवाग्राम येथे उपचारासाठी धाव घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या जास्त असल्याचे चित्र स्पष्ट होते. याबाबत सुरक्षित फवारणीबाबत कृषी विभागाने बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना, त्यांच्याकडून केवळ कागदी घोडे नाचविण्यात येते. परिणामी खरीप हंगामातील कीटकनाशक फवारणी शेतकर्यांसाठी घातक ठरत आहे.
हेही वाचा - शासकीय डॉक्टरांनी खासगी 'प्रॅक्टिस' केल्यास मिळणार नोटीस