यवतमाळ - दारव्हा तालुक्यातील तिवसा येथे सुभेदार अॅग्रो इंडस्ट्रीज कारखान्यातील सेंद्रीय गुळाला विदर्भासह पुणेकरही पसंती देत आहेत. तिवश्यातील 80 वर्षीय प्रयोगशील शेतकरी आनंद सुभेदार यांनी 1990 ला सेंद्रीय गूळ निर्मिती कारखाना सुरू केला होता. त्याच्या या प्रयोगाला हळूहळू प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.
यवतमाळ-दारव्हा रस्त्यावरील तिवश्याजवळ आनंद सुभेदार यांनी 65 एकरात ऊस लागवड केली. 65 एकरात साधारणपणे 11 ते 12 हजार टन ऊसाचे उत्पादन निघते. या उसाला कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत न देता केवळ सेंद्रीय पद्धतीने या उसाचे उत्पादन घेतले जाते. या ऊस तोडणीसाठी हिंगोली जिल्ह्यातून मजूर आणले जातात. हा गूळ तयार करण्यासाठी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून कारागीर व मजूर आणले जातात. यात कोणत्याही प्रकारची रसायने वापरली जात नाही त्यामुळे आरोग्यासाठी सेंद्रीय गूळ पोषक असल्याचे डॉक्टर सांगतात.
हेही वाचा - हृदयद्रावक : मुलाची 'ती' आर्त हाक वडिलांनी ऐकलीच नाही
साधारणपणे 1 किलो हा सेंद्रीय गूळ तयार करण्यासाठी 40 ते 42 रुपये खर्च येतो. 50 रुपये प्रति किलो या ठोक भावात त्याची विक्री केली जाते. हा गूळ यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती, नाशिक जिल्ह्यात विक्रीसाठी जातो. काही दिवसांपूर्वी पुण्यात हा गूळ विक्रीसाठी पाठवण्यात आला. पुणेकरांनीही या सेंद्रीय गुळाला पसंती दिली असून, चांगला भावही मिळत आहे.