यवतमाळ- जिल्ह्यात आज आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 7 झाली आहे. तर आज दारव्हा येथील 12 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनामुळे आज मृत्यू झालेला व्यक्ती हा 60 वर्षांचा आहे. तो दारव्हा येथील रहिवाशी असून त्याचा मृत्यू घरीच झाला होता. त्याचे नमुने तपासणीकरीता यवतमाळ येथे पाठविले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच आज दरव्ह्यातील 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे सर्व जण सुरवातीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील) आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 6 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांमध्ये दारव्हा येथील 70 वर्षीय आणि 66 वर्षीय पुरुषांसह दोन 12 वर्षीय, एक 7, व 6 वर्षीय मुलांचा समावेश आहे. तसेच 46 आणि 35 वर्षीय महिलांसह, 23, 21, 16 व 12 वर्षीय मुलींचा समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 44 झाली असून सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 197 आहेत. यापैकी तब्बल 146 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 7 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.
दरम्यान, दारव्हा येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लगातार वाढत असल्याने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार मंगळवारी दरव्ह्यामध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रतिबंधित क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक सुचना दिल्या.
तसेच दरव्ह्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व येथे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर गांभिर्याने लक्ष ठेवण्यासाठी पुढील 14 दिवस जिल्हाधिकारी रोज दारव्हा येथे भेट देणार आहेत. यावेळेस ते येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थिती हाताळणार आहे.