यवतमाळ - मारेगांववरुन 6 किलोमिटर अंतरावर असलेल्या बुरांडा जवळील कृषी महाविद्यालयाजवळ दोन ट्रेलरची समोरासमोर धडक होऊन एक जागीच ठार झाला. तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
चालक मधुशाम दत्ता भारती (वय २९ वर्षे, रा. नांदाफाटा) असे मृतकाचे नाव आहे. ट्रेलर क्रमांक (एमएच ३४ ए बी २८०६) रात्री ११ वाजताचे दरम्यान मारेगांवकडे येताना समोरुन येणाऱ्या (एम एच ३४ ए व्ही १२३१) या ट्रेलरला जबर धडक दिली. दोन्ही ट्रेलरची टक्कर एवढी भीषण होती की त्यात मधुशाम हा चालक केबीनमध्ये फसुन त्याचा मृत्यु झाला. तर सागर किसन नेहारे (वया२४ वर्षे, रा. मोहदा ता.केळापुर), उल्हास सिताराम चव्हाण (रा.पोहरादेवी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी करत आहेत.
हेही वाचा - यवतमाळ जिल्ह्यातील आदर्श गावाची वाट बिकट