यवतमाळ - जिल्ह्यात विविध ठिकाणी बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती तसेच संशयितांसाठी संस्थात्मक क्वारंटाइनची सोय करण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी अपुऱ्या सोईसुविधा असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
निकृष्ट दर्जाचे जेवण, सोयींचा अभाव असल्याचे एका रुग्णांने सांगितले. याबाबत तक्रार केल्यानंतर काही प्रमाणात सुधारणा झाली. मात्र, पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येते. मात्र, याठिकाणी मिळणारी सुविधा अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याने निगेटिव्ह रुग्ण पॉझिटिव्ह होतील, अशी खंत एका रुग्णाने व्यक्त केली.
नुकतीच मुलींच्या वसतिगृहातील कोविड कक्षात रुग्णांच्या जेवणात गोम निघाल्याने खळबळ उडाली आहे. निकृष्ट दर्जाचा आहार व जेवणात निघालेल्या गोमेचा फोटो व व्हिडिओ व्हायरल झाला. तसेच यापूर्वी देखील जेवणात अळ्या आढळून आल्या होत्या. त्यावेळी रोष व्यक्त करण्यात आल्याने जेवणाचा दर्जा सुधारण्याची मागणी झाली. मात्र, आता पुन्हा परिस्थिती पूर्वीप्रमाणेच झालीय.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कोरोनाबाधितांना पोषक आहार देणे गरजेचे आहे. मात्र, निकृष्ट जेवण देऊन रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. त्याचबरोबर नाश्ता, फळ, अंडी, पिण्याचे पाणी, गरम पाणी, स्वच्छतेचा अभाव यामुळे येथील संशयित संतप्त आहेत.
स्वच्छता गृहात पाणी नाही. प्यायला पाणी मिळत नाही, असे सांगत कोविड निधीच्या खर्चाची चौकशी पालकमंत्री संजय राठोड यांनी करावी, अशी मागणी नगरसेवक प्रवीण प्रजापती यांनी केली आहे.