यवतमाळ : जरीजामनी तालुक्यातील जुणोनी येथे पतीने पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. यात पत्नी जागीच ठार झाली. सिद्धार्थ बिरबल पुसाटे (35), असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीला मुकुटबन पोलिसांनी अटक केली आहे. पती-पत्नीत नेहमी छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद व्हायचे. ही हत्याही केवळ शुल्लक कौटुंबीक वादातून झाल्याचे समोर आले आहे.
कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनमुळे झाला वाद-
आरोपी सिद्धार्थ पुसाटे (35) हा जुणोनी गावातील रहिवाशी आहे. आरोपी हा त्याची पत्नी रिया उर्फ सरस्वती (30) दोन मुली व वडिलांसह राहतो. त्याला एक अडीच वर्षांची तर दुसरी 4 महिन्याची मुलगी आहे. रियाला कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करायचे होते. तिने याबाबत पतीशी बोलून दाखवले व मुलींचा जन्मदाखला मागितला. त्यावर पतीने मुलीचा जन्म यवतमाळला झाला असल्याने तिथून आणावे लागेल व सध्या पैसे नसल्याने यवतमाळला जाऊन दाखला आणणे शक्य नसल्याने वाद विकोपाला गेला.
रागाच्या भरात रियाने पती सिद्धार्थच्या दोन थोबाडीत लावल्या. त्यावरून पतीने चिडून पत्नीला ढकलून खाली पायरीवर पाडले व स्वयंपाक घरातील कुऱ्हाड आणली. त्याने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात रियाच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर इजा होऊन रक्तस्राव झाला. त्यामुळे ती जागी ठार झाली.
आरोपीला अटक, खुनाचा गुन्हा दाखल-
गावातील पोलीस पाटील यांनी तक्रार नोंदवली असून आरोपी सिद्धार्थ बिरबल पुसाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार व ठाणेदार धर्मा सोनुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड व जितू पानघाटे करीत आहे.
हेही वाचा- कोरेगाव भीमा हिंसाचार: रोना विल्सनच्या लॅपटॉपबाबत करण्यात आला 'हा' दावा