यवतमाळ - शहर पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. राजू खंडुजी उईके (वय-55) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहली असून, माझ्या मृत्यूस कोणीही जबाबदार नाही, असे लिहून शेवटी 'जय हिंद' सर असे लिहले आहे.
जमादार राजू उईके यांनी रात्री मेन लाइन परिसरात गस्तीवर राहून आपले कर्तव्य बजावले होते. तर मृत्यूपूर्वी लिखाण करताना चिठ्ठीवर 5 वाजून 45 मिनिट ही वेळ नमूद केली होती. ते गुन्हे शाखेत कार्यरत होते. शासनाच्या परिपत्रकानुसार पोलीस विभागाकडून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती कागदपत्रे जात वैधता कार्यालयात सादर केली होते. त्यानुसार त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले होते. त्यानंतर ते जात प्रमाणपत्र पोलीस विभागात सादर करण्यासाठी गेले होते. मात्र, विभागातील कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन आदेश सादर करण्याचे सांगितले होते. त्यामुळे ते मानसिक तणावमध्ये होते.
मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये त्यांनी आपल्याला मणक्याचा त्रास असून, त्याच्या वेदना असह्य होत आहेत. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जाणार असेही नमूद केले आहे. माझ्या मृत्यूस कोणीही जबाबदार नाही आणि शेवटी 'जय हिंद' सर असे लिहून स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे घटनास्थळी दाखल झाले.