यवतमाळ - मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वनोजा (देवी) येथे अवैधरित्या साठवणूक केलेली तब्बल 400 ट्रक रेती (3 हजार ब्रास) जप्त करण्यात आली. या रेतीची किंमत सुमारे 50 लाख रुपये इतकी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नेमलेल्या विशेष पोलीस पथकाने सायंकाळी 4 वाजता ही कार्यवाही केली. पुढील कारवाईसाठी प्रकरण महसूल विभागाकडे सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आल्याने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
विशेष पोलीस पथकाची कारवाई
विशेष पोलीस पथक प्रमुख सहायक पोलीस निरक्षक मुकुंद कवाडे यांना वनोजा शिवारात एका शेतात मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठवून असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पथकाने हिवरा ते गोरज मुख्य रस्त्याच्या बाजूला शामराव जीवतोडे (रा. गोरज, ता. मारेगाव) यांचे खुल्या शेतात साठवणूक केलेली तब्बल 500 ट्रक रेती धाड टाकून जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या रेती साठ्याचे फोटो व चित्रीकरण करण्यात आले. प्रकरण महसूल विभागाशी निगडित असल्यामुळे उपविभागीय अधिकारी वणी डॉ. शरद जावळे यांना माहिती देण्यात आली. तसेच मारेगावचे तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना योग्य ती कारवाईसाठी पाचारण करण्यात आले. मंडळ अधिकारी यांना लेखी तक्रार, पंचनामा व फोटो व्हिडीओ सादर करण्यात आले असून महसूल विभाग पुढील कारवाई करीत आहे. याप्रकरणी वणीचे उपविभागीय अधिकारी शरद जव्हाळे यांना विचारणा केली असता रेती साठ्याची परवानगी महसूल विभागाने दिली असल्याचे सांगितले. ही कारवाई विशेष पोलीस पथक वणी व पांढरकवडा उपविभागीय प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पोलीस हवालदार राजू बागेश्वर, जितेश पानघाटे, निलेश भुरे, शिपाई मुकेश करपते, मिथुन राऊत व पोलीस वाहन चालक अजय वाभीटकर यांनी पार पाडली.