यवतमाळ - येथील पाटीपुरामधील दलित सोसायटीमध्ये राहणाऱ्या पती-पत्नीला विजेच्या तारेचा धक्का बसला. यात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना काल (शुक्रवार) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
रवी मारुती पाटील (वय 35) असे मृताचे नाव असून सोनाली रवी पाटील (वय 30) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. गंभीर जखमी झाल्याने सोनालीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सोनाली रवी पाटील ही स्वयंपाक गृहाच्या बाजूला असलेल्या तारेवरील कपडे काढण्यासाठी गेली होती. यावेळी पाठीमागे लाईटचे बटन दाबले गेले असता तिला विजेचा धक्का लागला. तिला वाचवण्यासाठी पती रवी पाटील गेला असता जिवंत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा होताच, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले, तर पत्नी सोनाली हिच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
मृत रवी पाटील हा नगरपालिकेच्या अग्निशमन दलालामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. तो आपल्या पत्नीसह मावशी भारती डबले यांच्याकडे राहत होता. त्याच्या पाठीमागे तीन वर्षांची मुलगी धानी, मोठा भाऊ संजय आणि लहान भाऊ शशी, आई भाग्यवती पाटील असा परिवार आहे.