यवतमाळ - पाटीपुरामधील दलित सोसायटीमध्ये राहणाऱ्या पती-पत्नीला विजेच्या तारेचा धक्का बसल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. दरम्यान, या घटनेतील दाम्पत्याची ३ वर्षाची मुलगी धानी ही माझे आई-बाबा कुठे गेले असे सर्वांना विचारताच सर्वजण निशब्द होत आहेत.
रात्रीच्या सुमारास परिसरातील नळाला पाणी आल्याने मृत रवी पाटील पाणी भरण्यासाठी आपल्या मावशीसह गेले होते. तर पत्नी सोनाली ही स्वयंपाक गृहातील ओटा पुसून ओले फडके तारेवर टाकण्यासाठी गेली आणि त्याचवेळी तिने किंचाळी फोडली. याचवेळी आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकूण ३ वर्षीय धानी या मुलीनेही आपल्या बाबाला आवाज दिला. यादरम्यान, आवाज ऐकताच पती रवी आणि मावशी यांनी सोनालीकडे धाव घेतली. यावेळी तिला विजेचा धक्क लागल्याचे पाहून वाचवण्यासाठी गेलेला रवीने ती जिवंत तार एकाच झटक्यात खाली ओढली. परंतु या दरम्यान, तार हाताला गुंडाळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र, २ मिनिटापूर्वीच मुलगी धानी हिने बाबाला हाक मारली होती. तर मी आलो अशी सादही रवीने दिली होती. परंतु, ते काही परतले नाही.
गंभीर जखमी झालेली सोनाली ही जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. तर ३ वर्षाच्या धानीचे बाबा तर गेले. मात्र, आई ही मृत्यूशी झुंज देत असल्याने तिचा सांभाळ नातेवाईक करीत आहे. दरम्यान, माझी आई, माझे बाबा कुठे गेले असे तिने सर्वांना विचारताच सर्वेजण निशब्द होत आहे. हृदय हेलावणाऱ्या या घटनेमुळे पाटीपुरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.