यवतमाळ- टिपेश्वर अभयारण्यात फिरणारे तीन शिकारी वनविभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. शिकाऱ्यांच्या वडवाट येथील घरातून चितळाची शिंगे, मोर पिसे, भाला आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
प्रादेशिकचे वनसंरक्षक रवींद्र वानखेडे यांना तीन शिकारी टिपेश्वर अभयारण्यात फिरताना दिसले. काही वेळात ते दर्यापूर, ठाणेगाव, खैरी, वडवाटमार्गे निघून गेले. ही माहिती वानखेडे यांनी वनविभागाच्या पथकाला दिली. पथकाने लगेच वडवाट येथे छापा टाकला. यावेळी सुरेश टेकाम, पोतू टेकाम, दिलीप टेकाम यांना ताब्यात घेतले. सुरेश टेकाम यांच्या घरातून चितळाची शिंगे, मोराची पिसे, सत्तूर, भाला ही साहित्य मिळून आली. तर, पोतू टेकाम याच्या घरात मोराची पिसे आढळली आहेत. शुक्रवारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे टिपेश्वर अभयारण्यात शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.