हिंगोली MP Hemant Patil Resign : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही आंदोलक खासदार पाटील यांना भेटायला गेले होते. त्यावेळी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. त्यानंतर हेमंत पाटील यांनी तत्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावानं राजीनामा लिहून दिलाय.
राजीनामा दिला लिहून : हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मराठा आरक्षणासाठी दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी खासदार हेमंत पाटील यांना घेराव घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर खासदार पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांच्या नावानं राजीनामा लिहून दिलाय.
जोरदार घोषणाबाजी : यवतमाळच्या पोफळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्यात खासदार पाटील आले होते. त्यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दिल्लीत खासदारांची बैठक बोलावली आहे. मात्र, मराठा बांधवांनी मागणी केल्यास एका मिनिटात राजीनामा देऊ, असं खासदार पाटील यांनी यावेळी सांगितलं.
दिल्लीत उपोषण करणार : खासदार हेमंत पाटील यांचा ताफा रविवारी हदगावात अडवण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, जरांगे यांच्या तब्येतीला काहीही होऊ नये, असं आंदोलकांनी हेमंत पाटील यांना सांगितलं. दोन दिवसांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषण करणार असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं.
...तोपर्यंत चर्चेला या : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस होता. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवली आहे. जोपर्यंत मी बोलू शकतो तोपर्यंत चर्चेला या, नंतर काही उपयोग नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सरकारपुढं दोनच पर्याय उरले आहेत, मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर मराठ्यांना सामोरे जा, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
हेही वाचा -
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक, अनेक नेत्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द; जाणून घ्या राज्यात कुठे काय परिस्थिती
- Maratha Reservation : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवीगाळ केलेला मराठा तरुण 'ईटीव्ही भारत'वर; म्हणाला...
- Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, मराठा समाज आक्रमक; पाहा व्हिडिओ