यवतमाळ- घाटंजी तालुक्यातील कापशी येथील ग्रामसेवक सुनील दरवे हे २६ जानेवारीला गावात ध्वजारोहण कार्यक्रमाला आले होते. त्यानंतर चक्क मे महिन्यात ते गावात अवतरले. त्यामुळे, कापशीतील गावकऱ्यांनी ग्रामसेवक व पंचायत समिती प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराज होऊन चक्क गांधीगिरी पध्दतीने ग्रामसेवकाचे पाय धुवून त्याची आरती करून पुष्पगुच्छ देत स्वागत केले आहे.
कापशी हे पेसा अंतर्गत येणारे आदिवासी बहूल गाव आहे. गावाची लोकसंख्या ही ८५० इतकी असून गावाला अनेक समस्या भेडसावत आहे. मात्र, गावातील समस्या सोडवण्यासाठी निवडलेले प्रशासक हे गावाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ग्रामसेवक दरवे हे गेल्या ४ महिन्यापासून गावात आले नाही, विस्तार अधिकऱ्यांनी देखील गावाचा आढावा घेतला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील समस्या कुणीही गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे ४ महिन्यानंतर गावात परतलेल्या ग्रामसेवकाचे गावकऱ्यांनी गांधीगिरी पध्दतीने स्वागत केले आहे.
हेही वाचा- सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश, ३ लाख ८० हजारांची तंबाखू जप्त