यवतमाळ - कापूस निघून शेतकऱ्यांच्या घरी येत आहे. मात्र, सीसीआयचे खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. व्यापारी गावात जाऊन (खेडा खरेदी) कावडीमोल भावात कापूस खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ५०० रुपये ते एक हजार रुपयांच्या घरात तोटा होत आहे.
आधीच शेतकरी संकटात सापडला आहे. खेडा खरेदीमुळे त्यात आणखी भर पडली. सरकारने अद्यापही सीसीआय खरेदी केंद्र सुरू केले नाही. आर्थिक अडचण असल्याने शेतकरी कावडीमोल भावात कापूस विक्री करून आपली अडचण दूर करत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा खासगी व्यापारी घेत आहेत. गावागावात जाऊन कापूस खराब आहे, असे म्हणून कमी दरात खरेदी करीत आहे. बाजार समितीत 4 हजार 500 रुपये मिळत असताना खेडा व्यापारी 3 हजार 700 ते 4 हजार रुपयांच्या दराने खरेदी करत आहेत.
आधीच अवकाळी पावसामुळे एकरी २ ते ३ क्विंटलपर्यंत उत्पन्नात घट आली आहे. त्यात हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. अवकाळी पावसामुळे कपाशीचे नुकसान झाले आहे. एकरी उत्पन्नात घट येत आहे. खासगी व्यापारी लूट करत आहेत. त्यामुळे सरकारने चांगला भाव देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.